Sunday, November 27
Shadow

सावत्र आईने या मुलीचा खूप छळ केला पण, शेवट पाहून डोळ्यात पाणी येईल.

थंडी… संध्याकाळी देवळातून आलं की अंगणातल्या बंगईवर सुनिता जरा वेळ बसायची….तेच दोनचार क्षण निवांतपणाचे…कडूगोड आठवणीत रमण्याचे ! दिवाळी जवळ आली …थंड हवा अंगाला झोंबू लागली…सुनिता बोचणाऱ्या थंडीच्या भुतकाळात हरवली…. पहिलीत असतानाच आई छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन गेली. काही दिवसातच नवी आई आली. नव्याचं नवेपण नऊ दिवसही टिकलं नाही.

दोन दिवसात पाहुणे गेले आणि माघ महिन्याच्या थंडीतही छोटी सुनिता सावत्रपणाच्या आगीत होरपळू लागली. कामाचा बोजा आणि अपुरं उरलेलं अन्नासोबत कधी कधी नवी आई अंगावर पण यायची ! बाबा मधे बोलले तर त्यांनाही भांडायची. थंडी वाढली तसं बाबांनी तिच्यासाठी सुंदर स्वेटर आणलं .कितीतरी दिवसांनी कोमेजलेला चेहरा खुलला. सगळं विसरून तिचं निष्पाप मन आनंदाने बागडू लागलं. छोट्या परीची हसरा चेहरा पाहून बाबीही हरखले….

नवी आई आली ,एका क्षणात अंगावरचा स्वेटर ओढून काढल्या गेला आणि काही वेळातच त्याचे तुकडे तुकडे झाले….दरवर्षी स्वेटरसाठीच नाही तर ,उललेल्या हातापायाला लावायला तेलासाठीही ती तरसली ! नव्या आईने तिच्या मैत्रीणीच्या मुलाला ,प्रभाकरला देऊन सुनिताचा सौदा केला. प्रभाकरही मैत्रिणीचा सावत्र मुलगा !सुनिता आणि प्रभाकर दोघंही सारख्याच परिस्थितीत मोठी झालेली…एकमेकांचं दुःख समजू शकणारी…सुनिताची स्थिती आगीतून फुफाट्यात गेल्यासारखीच !

पहिला दिवाळसण आला. थंडी पडू लागली. माहेरची तर काही ऊब नव्हतीच ,पण सासरीही बोचणारीच थंडी ! पण प्रभाकरची गुलाबी मिठी आणि प्रेमळपणाची, समजूतदारपणाची ऊब आता सुनिताला दिलासा देऊ लागली. सासूचा तिरस्कार आणि राग प्रभाकरच्या प्रेमापूढे जाणवेनासा झाला. त्याने हौसेने तिच्यासाठी स्वेटर आणि आईसाठी शॅाल आणली. स्वेटर पहाताच सुनिताला जुना प्रसंग कालच घडल्यासारखे आठवला आणि तिचे डोळे भरून आलेआणि उपकृत नजरेने ती त्याच्याकडे पाहू लागली.

तोच सासू कडाडले,”आण तो स्वेटर इकडे …” सुनिता प्रभाकर हताशपणे एकमेकांकडे पाहू लागले. कितीतरी हिवाळे गेले स्वेटर शालविना….पण दोघांतील प्रेमाचा ,सांमजस्याचा उबदारपणा वाढत होता.संसार फुलू लागला,दोनाचे चार झाले…आजी सगळं विसरून नातवात रमली. एका दिवाळीला सासूने स्वतः सुनितासाठी स्वेटर आणला. सरळ निष्पाप मनाच्या सुनिताने तो आढेवेढे न घेता घातला. पण तिला जाणवलं ,उष्ण शब्दांच्या आठवणीने हा स्वेटर थंडीपेक्षाही जास्त टोचतो…बोचतो !

त्यापेक्षा बोचणारी थंडीच सुखावह वाटते! तिला आयुष्यात कधी स्वेटर शाल वापरायची इच्छा झाली नाही. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सासूबाई गेल्या…गरम कपडे…गरमगरम सुप,जेवण…उबदार खोली….मनात कुठलाही किंतु न ठेवतां सुनिताने त्यांचं काळजीने सगळं केलं.भरल्या डोळ्यानी आणि पश्चातापाच्या अश्रुंनी त्या सुनिताला हातात हात घेऊन स्वेटर घालण्यासाठी विनवू लागल्या…

त्यांचा मान राखण्यासाठी सुनिताने स्वेटर अंगावर चढवला ….आणि तिला जाणवलं सासूबाईंची समाधानाची नजर अचानक स्थिर झालीय …हातातला हात थंड पडलाय…. अचानक सुनिता भानावर आली….केतकीने,तिच्या सुनेने ,ती बऱ्याचवेळची विचारात हरवलेली पाहून तिच्या अंगावर हळूच एक उबदार शाल पांघरली होती….आणि प्रभाकर त्याच प्रेमळ नजरेने त्यांच्या नात्यातील उब अनुभवत होता !

मित्रानो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कंमेंट करून आम्हाला कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published.