काय गं तुझी छाती एवढी ढिली कसं काय पडली ? लग्नाआधी असं नसतं पोरींचं, आईने प्रश्न विचारला…

“काय गं तुझी छाती एवढी ढिली कसं काय पडली ? लग्नाआधी असं नसतं पोरींचं.” आईने प्रश्न विचारला आणि काळजात धस्स झालं.. काय सांगणार होते. माझीच चूक झाली, तिच्यासमोर ड्रेस बदलला. बारीक लक्ष असतं. अंघोळीच्यावेळी पाठीला साबण लावताना तिने परत तोच प्रश्न केला. कसातरी मी विषय टाळला. संशय तर आला नसेल ना. क्लास ला चालले म्हणलं तरी सतरा प्रश्न असतात तिचे. रात्री चुकून उशीर झाला तर चार दिवस तेच ऐकवणार.

याला सांगितलं तर हसायला लागला. वेडीये म्हणे तुझी आई. याचं काय जातंय, तिला जर कळालं तर उभी फाडून खाईल मला. कित्येकदा याला म्हणाले जास्त नको हात लावत जाऊ, पण हा कुठे ऐकतोय. मधल्या मध्ये माझं मरण. मध्येच तिला काहीही आठवतं, या महिन्यात पाळी आली नाही का तुला ? हा काय प्रश्न आहे का ? तिचं काय चूक म्हणा. खेड्यात राहतो. काळजी वाटणारचं.

कधीकधी वाटतं मी चुकीचं तर करत नाहीये ना काही. लग्न करणार आहोत आम्ही. त्याचं किराणा दुकान आहे. आमच्याचं जातीतला , घरचेही चांगलेत. आईला वाटतं पोरीनं अख्खा जन्म खेड्यात नको काढायला. एखादं शहरातलं पोरग मिळालं की लावून द्यायचं लग्न. माझ्या बापानं शहरातली नोकरी सोडली आणि ते दोघं कायमचे या खेड्यात राहायला आले. तिचं स्वप्न राहिलंच. त्यामुळे ती मला इथे नाही राहू देणार.

पण मी तो सोडून दुसर्या पुरुषाचा विचार नाही करू शकत. सगळं काही त्याला दिलं. सुरूवातीला शरीरसंबंध ठेवणार नव्हते. तो गोळ्या आणून द्यायचा. मीपण खायचे. लग्न त्याच्याशीच करणार असल्यामुळे मी विचार करायचं सोडून दिलं.

जोपर्यंत शरीरसंबंध नव्हता तोपर्यंत आमच्यात ओढ होती. तो माझ्यासाठी वाट्टेल ते करायचा. तासनतास फोनवर बोलायचा. ओढ्याकडं भेटायला यायचा. कॉलेज सुटायच्या आधीच गेटवर हजर, दर्ग्याला जायचो, तिथून गणपतीच दर्शन घेऊन तळ्याकडे फेरी .माझ्यासाठी कधी कानातलं घेणार, गुपचूप ग्रीटिंग देणार, बर्फाचा गोळा ड्रेस मध्ये टाकणार, डोळ्यात पाणी आलं तर त्याचे डोळे भरून येणार, मी चिडले तर तोंड बारीक करून बसणार….. पण आता तसं काही होत नाही.

जेव्हा शरीर हवं असतं तेव्हा त्याला माझी आठवण येते. फोन करून बोलावतो. भांडणं झाली तर, जा लग्न करत नाही म्हणतो. त्याला कळत कसं नाही मला त्रास होतोय या सार्याचा. दुसरा पुरुष छातीवर पाहायचा म्हणलं तरी घाम फुटतो. विचार करवत नाही. यालाही तेच पाहिजे वाटतं. म्हणतो, आईबाप सांगतील त्याच्याशी लग्न कर. असं कसं करू.

बाई शरीर देण्याआधी मन गुंतवून बसलेली असते. शरीराला झिडकारता येतं, मन मात्र आठवणीत तुंबून राहतं. शरीराचा ओलावा पाच मिनिटात आटतो, मनाला मात्र पाझर फुटला की पान्हा सतत वाहतो. मांड्यामध्ये घुसण्यासाठी तिच्या मनाला सतत भोक पाडायचं आणि… राजा…, तू सांडलेल्या शुभ्र आठवणींना तिनेच उपसत राहायचं ?….

मित्रानो लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करू शकता. फोटो प्रतिकात्मक आहे. – अभिनव ब. बसवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *