Monday, November 28
Shadow

एका वडापावसाठी या महिलेने आपल्या बाळासाठी जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल!

‘प्रभात’जवळील सिग्नलपाशी एक जर्जर वृद्धा आणि तिची गतिमंद मुलगी नेहमी दिसे. आज दुपारची कातरगोष्ट. सिग्नलपाशी भिक मागत फिरणाऱ्या दोन प्रौढ स्त्रिया मागेपुढे करत होत्या. त्यांच्या पाठीवरच्या झोळीत तान्हुली पोरे होती. त्या स्त्रियांना कोपऱ्यावरच्या वडापाववाल्याने एका कागदाच्या भेंडोळीत वडे बांधून दिले. त्यांना भूक खूप लागली असावी, रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या कंपाउंड वॉललगतच्या सावलीत त्या दोघी बसल्या.

काही अंतरावर बसलेली वृद्धा त्या दोघींना आशाळभूत नजरेने पाहत होती. त्या दोघींचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते. त्यांचे धुळीत माखलेले, भेगाळलेले अनवाणी पाय त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्षांची ग्वाही देत होते. अखेर न राहवून ती वृद्धा जागेवरून उठली, मांडीवर डोकं ठेवून बसलेल्या तिच्या गतिमंद कुमारीकेस तिने तिथेच बाजूस टेकवले आणि ती त्या दोघींच्या दिशेने निघाली. ती त्या दोघींच्या पुढ्यात आली. एव्हाना त्यांचा जठराग्नी अगदी पेटून उठला होता.

खरे तर त्या दोघींनाही तिला काही हिस्सा द्यायचा होता मात्र भुकेने त्यांना काही सुचत नव्हते. शेवटी त्या वृद्धेने फाटक्या पदरात गुंतवलेले एकमेव रुपयाचे नाणे काढून त्यांच्या पुढे धरले. तत्क्षणी मला व्यंकटेश माडगूळकर आठवले. त्यांच्या ‘करुणाष्टक’मध्ये भुकेलेल्या पोटच्या पोरांसाठी दारावर येणाऱ्या गोसाव्याकडून त्याला भिक्षा म्हणून मिळालेले पीठ विकत घेणारी आई वाचताना भडभडून येते ! आताही त्या मळकटलेल्या खंगलेल्या वृद्धेने त्या दोघींसमोर रुपयाचं नाणं धरलं तेंव्हा त्यांना अक्षरशः भरून आलं !

त्या दोघी गदगदून गेल्या आणि हातातल्या कागदाच्या भेंडोळयात होतं नव्हतं ते सर्व त्यांनी तिच्या हाती दिलं. तेव्हढ्यात एकीच्या पाठचं मुल जागं होऊन रडू लागलं, तिने त्याला पुढ्यात घेऊन छातीशी लावलं तर दुसरी चालत पुढे गेली आणि तिने वृद्धेच्या मुलीपाशी जाऊन तिच्या गालावरून हात फिरवला. नजर लागू नये म्हणून दोन्ही हातांची बोटे कानापाशी नेऊन मोडली आणि कनवटीला बांधलेली चिल्लर काढून तिच्या हाती दिली. ती निष्पाप निरागस मुलगी अपार मायेने तिच्याकडे पाहत होती तर जवळच उभ्या असलेल्या वृद्धेच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.

रस्त्याच्या कडेला असलेल्या सरस्वती मंदिरापाशी उभं राहून पाहताना माझ्या पायाला रग लागली होती, हात नकळत खिशाकडे गेला. खिशात फार काही पैसे नव्हते मात्र नेमके किती होते हे ठाऊक नव्हते मात्र तिथून निघताना खिशात नाणी नोटा यातलं काहीच नव्हतं. अनमोल तृप्ततेची रास मात्र खिशातून ओसंडून वाहत होती. कधी कधी वाटते आपल्याकडे खूप पैसे असायला हवेत, घेणाऱ्या हरेक हातांना देता यायला पाहिजे इतकी श्रीमंती हवी !

समीर गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published.